Sunday, November 17, 2019

पीक नुकसानभरपाईसाठी २५ नोव्हेंबरला किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन

अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी बी.टी.आर.भवन, बेलापूर या ठिकाणी संपन्न झाली. त्यात पुरेशा पीक नुकसानभरपाईसाठी २५ नोव्हेंबर रोजी राज्यभर शेतकरी आंदोलन उभारण्याची हाक देण्यात आली. 

अकाली पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात सत्ता स्थापनेच्या गोंधळात मश्गुल असलेले राज्यकर्ते शेतकऱ्यांना मदत करण्यात अक्षम्य टाळाटाळ करत आहेत. केंद्र सरकारनेही अटी शर्तींचे अवडंबर माजवीत शेतकऱ्यांना मदत करण्याची टाळाटाळ चालविली आहे. राज्यपालांनी आजच कोरडवाहू शेतीला प्रति गुंठा ८० रुपये आणि बागायती शेतीला प्रति गुंठा १८० रुपये अशी संतापजनक मदत जाहीर केली आहे. 

अशा पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यभर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. आंदोलन अधिक प्रभावी व्हावे यासाठी किसान सभेच्या सर्व जिल्हा समित्यांनी तातडीने विस्तारित बैठक घेऊन आंदोलनाची जोरदार तयारी करावी. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयांवर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन वा मोर्चे आयोजित करण्यासाठी जोमाने तयारी करावी असे आवाहन किसान सभेने केले आहे.

डॉ.अशोक ढवळे
जे.पी.गावीत 
किसन गुजर 
अर्जुन आडे 
डॉ.अजित नवले

गुंठ्याला ८० रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच!

अकाली पावसाने झालेल्या नुकसानीच्या  पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. हिशोब करता शेतकऱ्यांना गुंठ्याला यानुसार केवळ ८० रुपये मदत मिळणार आहे. बागायती पिकांना गुंठ्याला केवळ १८० रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. 

आज कांद्याच्या रोपाच्या एका वाफ्याचा दर ५००० रुपये झाला आहे. बागायती पिकांचा उत्पादन खर्च तर प्रचंड आहे. अशा पार्श्वभूमीवर ८० रुपयात किंवा १८० रुपयात, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तर सोडाच, गुंठ्याला लागणारा साधा बियाणांचा खर्च सुध्दा भागणार नाही हे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना, शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली ही मदत मान्य आहे का असा सवाल किसान सभा उपस्थित करत आहे. 

शेतकऱ्याच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नका, शेतकरी आई बापाचा अधिक तळतळाट घेऊ नका, जाहीर केलेल्या या तुटपुंज्या भरपाईचा तातडीने पुनर्विचार करा व एकराला किमान २५ हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत शेतकऱ्यांना जाहीर करा अशी मागणी किसान सभा करत आहे.

डॉ.अशोक ढवळे
जे.पी.गावीत
किसन गुजर
अर्जुन आडे
डॉ.अजित नवले