Tuesday, September 26, 2017

शेतकरी प्रश्नी २० नोव्हेंबर रोजी संसदेला महाघेराव ! किसान सभेच्या नेतृत्वाखाली लाखों शेतकरी सहभागी होणार !

शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने २० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे देशव्यापी भव्य संसद घेरावची हाक दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील दीडशेहून अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील २५ राज्यांमधून लाखों शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलनाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे ३४वे राष्ट्रीय अधिवेशन ३ ते ६ ऑक्टोबर २०१७ रोजी हरियाना येथील हिस्सार शहरात संपन्न होत असून या अधिवेशनात २० नोव्हेम्बरच्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येणार आहे. चार दिवस चालणा-या या अधिवेशनात देशभरातील २५ राज्यामधून सुमारे १००० प्रमुख शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शेतकरी नेते माजी आमदार आमरा राम, माजी खासदार हनन मोल्ला, माजी खासदार एस. आर. पिल्ले, माजी मंत्री डॉ. सूर्यकांत मिश्रा, खासदार जितेंद्र चौधरी, डॉ.अशोक ढवळे, एन. के. शुक्ला, विजू कृष्णन, माजी आमदार के. बालकृष्णन, माजी आमदार पी. कृष्ण प्रसाद इत्यादी अधिवेशनास संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रातून आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ.अजित नवले, दादा रायपुरे, अर्जुन आडे, उमेश देशमुख, बारक्या मांगात आदी २५ प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होत आहेत. समन्वय समितीत सहभागी इतर संघटनांनीही आपल्या स्तरावर आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के भावाची हमी द्या, शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, कसत असलेल्या जमिनी कसणारांच्या नांवे करा, शेतक-यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान थांबवा, शेतक-यांचे संपूर्ण वीज बिल माफ करा, शेतीला मोफत वीज द्या, शेतक-यांची भाकड जनावरे सरकारने खरेदी करा व त्यांचा सांभाळ करा, शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, गाईच्या दुधाला किमान ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ६५ रुपये हमी भाव द्या, शेतक-यांना पीक विम्यासह मोफत जीवन व आरोग्य विमा लागू करा, शेतक-यांच्या पोरांच्या शिक्षण व रोजगारातील समस्या सोडवा, शेतक-यांना वयाच्या ६० वर्षानंतर किमान ५००० रुपये पेंशन सुरू करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रातून हजारो शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या जनजागृतीसाठी किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र स्तरावर राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात २४ जिल्ह्यामध्ये किसान सभेच्या जिल्हा शाखांच्या वतीने होणा-या या मोहिमेत जिल्हा स्तरावर व्यापक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. किसान सभेचे सर्व राज्यस्तरीय नेते या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.

डॉ.अशोक ढवळे

केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा

1 comment:

  1. Are you in need of finance? we give out guarantee cash at 3% interest rate. Contact us on any kind of finance now: financialserviceoffer876@gmail.com whatsapp Number +918929509036 Dr James Eric Finance Pvt Ltd

    ReplyDelete