Monday, June 4, 2018

शेतकरी आंदोलनात सामील व्हा ! शेतकरी एकजूट बुलंद करा !

प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो !

एक जूनच्या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरून शेतकरी आंदोलनांची धार अधिक तीव्र केल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन !

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव व दुधाला रास्त भावाचा हक्क यासाठी सुरू असलेल्या आपल्या लढ्याला निर्णायक टप्प्यात घेऊन जाण्यासाठी आपले एक जूनचे आंदोलन नक्कीच पूरक ठरेल यात शंकाच नाही. मात्र भावांनो व भगिनींनो आपल्याला केवळ या एका कृतीवर थांबून चालणार नाही याची आपल्याला जाणीव आहे. म्हणूनच आपण या लढयानंतर लगेच समविचारी शेतकरी संघटनांबरोबर व कार्यकर्ते नेत्यांबरोबर चर्चा करून लढ्याचे पुढील कार्यक्रम ठरवत आहोत.

🌿पाच जून ते दहा जून

देशात तूर मोठ्या प्रमाणात पडून असल्याने तुरीचे भाव कोसळलेत. साखर पडून असल्याने उसाचे भाव कोसळलेत. राज्यात दूध अतिरिक्त झाल्याने दुधाला भाव नाही. अशा परिस्थितीतही भाजप सरकार देशात मोझॅम्बीकची तूर व पाकिस्तानची साखर आयात करत आहे. 

राज्यात दुधाचा महापूर असताना राज्यातील सरकार राज्यात गुजरात व कर्नाटकच्या दूध कंपन्यांना पायघड्या टाकून राज्यात दुधाची आयात करत आहे. सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात आपण पाच जून ते नऊ जून या काळात हा कृती कार्यक्रम करण्याचे ठरवीत आहोत. 

👉 मोझॅम्बीकची तूर, पाकिस्तानची साखर आणि गुजरात कर्नाटकचे दूध प्रत्येक तालुक्यातून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट पाठविण्यासाठी राज्यभर तहसील कार्यालयांवर कृती कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन करीत आहोत.

पाच जून ते नऊ जून या पाच  दिवसात आपण आपल्या स्तरावर गाव म्हणून, तरुण मित्र मंडळ म्हणून किंवा संघटना म्हणून एकत्र यावे. मूठभर तूर, मूठभर साखर, पिशवीभर दूध घेऊन तहसील कार्यालयात जावे. या वस्तू मुख्यमंत्र्यांना भेट पाठवीत असल्याचे निवेदन बरोबर न्यावे. आपल्या तहसील कार्यालयात जाऊन हे सर्व मुख्यमंत्र्यांसाठी भेट म्हणून तेथे जमा करावे, असे या कृती कार्यक्रमाचे स्वरूप असावे.

🌿 सात जून

सरकारने आंदोलनांची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांनी स्वतः आंदोलन हातात घ्यावे व शहरांना होणारा दूध व भाजीपाला यांचा पुरवठा रोखावा असे आवाहन 

🌿 दहा जून 

देशभर शेतकरी, आंदोलनात उतरला असतानाही केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करायला तयार नाही. अशा परिस्थितीत राज्यभर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारला ललकारण्याची आवश्यकता आहे. दिनांक दहा जून रोजी संपूर्ण राज्यभर रस्तारोको करून चक्काजाम आंदोलन करण्याची हाक आम्ही सर्व समविचारी शेतकरी संघटना आपणास देत आहोत. 

🙏आपण कोणत्या संघटनेचे, पक्षाचे, जातीचे, धर्माचे, नेत्याचे चहाते आहात हे पाहण्याची ही वेळ नाही. शेतकरी आई बापाच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. आपणास विनंती की आपला झेंडा कोणताही असो, आपण एक शेतकरी म्हणून, शेतकऱ्यांची पोरं म्हणून या आंदोलनात सामील व्हा ! शेतकरी एकजूट बुलंद करा !

धन्यवाद !

आपलेच 
शेतकरी संघर्ष समिती
व 
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

No comments:

Post a Comment