Saturday, November 17, 2018

नाशिक जिल्हा किसान सभेतर्फे २५ हजार शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर जबरदस्त मोर्चा

१४ नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्हा किसान सभेतर्फे २५ हजार शेतकऱ्यांचा जबरदस्त जिल्हाव्यापी मोर्चा नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात गोल्फ क्लब मैदानावरून होऊन साहित्यरत्न कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्याचे रूपांतर शिवाजी मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एका विशाल जाहीर सभेत झाले.

नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, पीक नुकसानीची भरपाई म्हणून हेक्टरी रु. ५०,००० रक्कम द्या, पिण्याचे पाणी, हाताला काम आणि गुरांना चारा देण्याची व्यवस्था करा, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाला देण्याची व्यवस्था करा, वनाधिकार कायद्याची तात्काळ काटेकोर अंमलबजावणी करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विजबिलमाफी करून त्यांना नवीन कर्ज द्या, उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भावासह स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी अमलात आणा, शेतकरी-शेतमजुरांना दरमहा रु. ५००० पेन्शन द्या या प्रमुख मागण्या होत्या.

मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे नेते . जे. पी. गावीत, डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, उत्तम कडू, नामदेव मोहंडकर, मोहन जाधव, हनुमंत गुंजाळ, रमेश चौधरी, रमेश बरफ, देविदास आडोळे, विजय पाटील, सुवर्णा गांगोडे, धर्मराज शिंदे इतर अनेकांनी केले

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शेतकरी संघटनेचे शांताराम पाटील यांनी स्वतःहून किसान सभेच्या या मोर्चास येऊन आपला पाठिंबा जाहीर केला

. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना भेटले आणि त्यांनी वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, पाण्याच्या साठवणुकीसाठी वनराई बंधारे, विहिरींचे खोलीकरण रुंदीकरण इतर महत्वाच्या दुष्काळी मागण्या मान्य केल्या आणि धोरणात्मक मागण्या शासनाकडे तात्काळ पाठविण्याचे मान्य केले.

२९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या किसान मुक्ती मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे या मोर्चाने ठरवले आणि उर्वरित प्रश्न शासनाने सोडविले नाहीत तर उग्र आंदोलनाचा इशारा दिला.

या मोर्चाला नाशिकच्या बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर फोटो बातमीसहित उत्तम प्रसिद्धी दिली.
No comments:

Post a Comment