Sunday, October 11, 2020

तलासरीत १० ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनाचा आगळावेगळा समारंभ : ठाणे-पालघर जिल्ह्यातील १,००० कार्यकर्त्यांचा सहभाग

 १० ऑक्टोबर २०२० रोजी पालघर जिल्ह्यात तलासरीच्या प्रशस्त कॉ. गोदावरी शामराव परुळेकर भवनात ठाणे-पालघर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतून आलेल्या १,००० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहभागाने एक आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला. चार ऐतिहासिक घटनांचा तो संगम होता. 


महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या स्थापनेचा आणि तेजस्वी वारली आदिवासी उठावाचा ७५व्या वर्षाचा अमृतमहोत्सव, या उठावातील पहिल्या हुतात्म्यांचा ७५वा वर्षदिन आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांचा २४वा स्मृतिदिन अशा या चार घटना होत्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या ठाणे-पालघर जिल्हा समित्यांच्या वतीने तो आयोजित करण्यात आला होता.

९२ वर्षे वयाचे ज्येष्ठतम नेते एल. बी. धनगर यांच्या हस्ते लाल झेंड्याचे क्रांतिकारी घोषणांच्या गजरात ध्वजारोहण झाल्यावर ८२ वर्षांचे आणखी एक ज्येष्ठ नेते माजी खासदार व माजी आमदार लहानू कोम यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली वाहिली. कॉ. गोदावरी परुळेकर आणि कॉ. शामराव परुळेकर यांच्या प्रतिमांना अनुक्रमे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. अर्चना प्रसाद आणि जागतिक कीर्तीचे पत्रकार व 'पारी'चे संस्थापक-संपादक पी. साईनाथ यांनी पुष्पहार घातले. 

पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य बारक्या मांगात यांच्या प्रास्ताविकानंतर समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी स्वीकारले. पी. साईनाथ, डॉ. अर्चना प्रसाद, जनविज्ञान संघटनेचे दिल्लीतील नेते डॉ. दिनेश अब्रॉल हे प्रमुख वक्ते होते. 

तसेच एल. बी. धनगर, लहानू कोम, पक्षाचे तीन केंद्रीय कमिटी सदस्य महेंद्र सिंह, माजी आमदार जे. पी. गावीत व मरियम ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य किसन गुजर व प्रा. ताप्ती मुखोपाध्याय, राज्य कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, तलासरी पंचायत समितीचे सभापती नंदू हाडळ आणि तलासरीच्या कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कॉलेजचे प्राचार्य बी. ए. राजपूत यांची भाषणे झाली. 

जमसंच्या केंद्रीय कमिटी सदस्या सोन्या गिल, बुकटुच्या सरचिटणीस प्रा. मधू परांजपे, प्रा. सुधीर परांजपे, श्री. मुखोपाध्याय, सोशल मीडिया आघाडीवरील कार्यकर्ते प्रसाद सुब्रमण्यम, पत्रकार श्री. अनिल ठाणेकर, श्री. अजित नार्वेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

अनेक दशके पक्षात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ स्त्री-पुरुष कॉम्रेडसचा या प्रसंगी लाल स्कार्फ घालून सत्कार करण्यात आला. 

या समारंभात जनशक्ती प्रकाशन, माकपची महाराष्ट्र राज्य कमिटी व ठाणे-पालघर जिल्हा कमिटी आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्यातर्फे सात वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ती पुढीलप्रमाणे:

१. वारली आदिवासींचा लाल बावटा : सातत्यपूर्ण संघर्षाचा रोमहर्षक इतिहास - अर्चना प्रसाद (अनुवाद - माया पंडित व उदय नारकर)
२. महाराष्ट्र राज्य किसान सभा : संक्षिप्त आढावा - गोदावरी परुळेकर
३. कथा निद्रिस्त ज्वालामुखीच्या स्फोटाची! - कृष्णा खोपकर
४. दादरा नगरहवेलीचा मुक्ती संग्राम, ठाणे जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अखिल भारतीय किसान सभेचे डहाणू अधिवेशन - एल. बी. धनगर
५. कॉ. शामराव आणि कॉ. गोदावरी परुळेकर : असामान्य कर्तृत्वाचे क्रांतिकारक जीवनकार्य - डॉ. अशोक ढवळे
६. किसान सभेची भक्कम संघटना कशी बांधावी? - एस. रामचंद्रन पिल्ले
७. विकासाचे युवापर्व : आमदार कॉ. विनोद निकोले यांचा प्रथम वर्षपूर्ती कार्य अहवाल. 

वरील पुस्तके तसेच गोदावरी परुळेकरांचे गाजलेले 'जेव्हा माणूस जागा होतो' व इतर पक्ष पुस्तकांचा स्टॉल जमसंच्या कार्यकर्तीनी लावला होता. त्यातून रु. २५,८५०ची विक्री या समारंभात झाली हे विशेष!

जोमदार क्रांतिकारी घोषणांच्या निनादात आणि पुढील लढयांसाठी प्रेरणा घेऊन या समारंभाची सांगता झाली. 

नवीन पिढीला राजकीय-वैचारिक-संघटनात्मक शिक्षण देण्यासाठी १२ ते १९ ऑक्टोबर या काळात शहापूर, वाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू व पालघर या ७ तालुक्यांत पक्षाची अभ्यास शिबिरे आयोजित केली गेली आहेत. प्रत्येक तालुका शिबिरात शेकडो प्रमुख पक्ष कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या प्रत्येक शिबिरातही पुरोगामी साहित्याचा स्टॉल लावला जाणार आहे.








1 comment:

  1. Are you in need of finance? we give out guarantee cash at 3% interest rate. Contact us on any kind of finance now: financialserviceoffer876@gmail.com whatsapp Number +918929509036 Dr James Eric Finance Pvt Ltd

    ReplyDelete