Monday, March 5, 2018

६ मार्च रोजी हजारो हजार शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च

६ मार्च रोजी हजारो हजार शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च

विधान भवनाला बेमुदत घेराव !

किसान सभेची आरपार लढ्याची घोषणा !

सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचले आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. किसान सभेने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लढ्याच्या पहिल्या टप्प्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विधानसभा अधिवेशन काळात राज्यभरातून हजारो हजार शेतकरी नाशिक येथून मुंबई विधानसभेवर पायी चालत येत लॉंग मार्च काढणार आहेत. दिनांक ६ मार्च २०१८ रोजी दुपारी ३ वाजता सीबीएस चौक, नाशिक येथून या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे. नाशिक येथून मुंबई पर्यंत पायी चालत आलेले हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरू राहणार आहे.

किसान सभेने मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सी.बी.एस. चौकात राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्काम सत्याग्रहाने शेतकऱ्यांचे प्रश्न दोन वर्षापूर्वी सरकारसमोर मांडले होते. महामुक्कामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. मे २०१६चा ठाणे शहरातील हजारो शेतकऱ्यांचा तिरडी मोर्चा, ऑक्टोबर २०१६ मध्ये वाडा, जि. पालघर येथे ५० हजार शेतकऱ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला दोन दिवस टाकलेला महाघेराव, मराठवाड्यात औरंगाबाद आणि विदर्भात खामगाव येथे हजारो शेतकऱ्यांनी केलेली राज्यस्तरीय आंदोलने आणि १ जून २०१७च्या संयुक्त व ऐतिहासिक शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने या मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली होती. 

प्रत्यक्षात मात्र सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांची वारंवार अत्यंत जीवघेणी फसवणूक केली आहे. किसान सभेने या पार्श्वभूमीवर नाशिकच्या याच सी.बी.एस. चौकात पुन्हा एकदा हजारो हजार शेतकऱ्यांना एकत्र करत विधान भवनावर चालत जाण्याचा संकल्प केला आहे. दिनांक ६ मार्च रोजी राज्यभरातील हे शेतकरी नाशिक येथून चालत मुंबईकडे निघणार आहेत. शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च मुंबई येथे पोहचल्यानंतर विधानभवनाला घेराव घालणार आहे. मागण्या धसास लागल्याशिवाय हा घेराव मागे घेतला जाणार नाही.

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लॉंग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहेत. 

डॉ. अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, बारक्या मांगात, इरफान शेख, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, रतन बुधर, रडका कलांगडा, इंद्रजीत गावीत आदी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. 

किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव विजू कृष्णन ६ मार्चपासून पहिले तीन दिवस या लॉंग मार्च मध्ये असणार आहेत आणि मुंबईत १२ मार्च रोजी किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार हनन मोल्ला, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक खासदार जितेंद्र चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य माजी आमदार नरसय्या आडम, केंद्रीय कमिटी सदस्य महेंद्र सिंह, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे हे प्रमुख जण भाग घेतील.
डॉ. अशोक ढवळे     (अखिल भारतीय अध्यक्ष, किसान सभा) 

आ.जे.पी.गावित      (माजी राज्य अध्यक्ष, किसान सभा)    

किसन गुजर         (राज्य अध्यक्ष, किसान सभा)        

अर्जुन आडे          (राज्य कार्याध्यक्ष, किसान सभा) 
    
डॉ. अजित नवले     (राज्य सरचिटणीस, किसान सभा)    

No comments:

Post a Comment