Wednesday, March 7, 2018

किसान सभेच्या लॉंग मार्चची नाशिकहून दणक्यात सुरुवात!

आज दुपारी ४.३० वाजता नाशिकच्या मुख्य सी.बी.एस. चौकातून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो हजार शेतकऱ्यांच्या जबरदस्त लॉंग मार्चची प्रचंड निर्धारात सुरुवात झाली. पुरुष शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो शेतकरी महिलाही या लॉंग मार्चमध्ये मुंबईपर्यंत त्वेषाने चालत आहेत हे त्याचे वैशिष्ट्य आहे. लाल झेंडे, लाल फलक आणि लाल बॅनर्सनी संपूर्ण परिसर लालेलाल झाला आहे. भाजप सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा तीव्र निषेध करणाऱ्या आणि कर्जमुक्ती, वनाधिकार, शेतीमालाला रास्त भाव, नदीजोड प्रश्न, पेन्शन, रेशन, बोण्डअळी व गारपीटग्रस्ताना भरपाई इत्यादी ज्वलंत मागण्यांच्या गगनभेदी घोषणा दिल्या जात आहेत. 

डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी. गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, इरफान शेख, सुनील मालुसरे, बारक्या मांगात, रडका कलांगडा, रतन बुधर, विलास बाबर हे किसान सभेचे राज्य पदाधिकारी या लॉंग मार्चचे नेतृत्व करत आहेत. सुरुवातीला झालेल्या सभेत किसान सभेच्या नेत्यांव्यतिरिक्त शेकापच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार मिनाक्षीताई पाटील, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड, आयटकचे नेते राजू देसले यांनी या लॉंग मार्चला पाठिंबा दिला. 

आज रात्रीचा मुक्काम वालदेवी नदीच्या किनाऱ्यावर होईल आणि उद्या हा मार्च इगतपुरीकडे निघेल.
No comments:

Post a Comment